नसरापूर नंतर आता चाकण ‎ ‎चिमुकलीचा विनयभंग; नराधमाला बेड्या ‎ ‎ही विकृती येते कुठून? - टॉप न्यूज मराठी

‎पुणे जिल्हा सध्या एका भीषण चक्रव्यूहात अडकलाय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. भोर तालुक्यातील नसरापूरची घटना ताजी असतानाच, आता चाकणमधूनही तशीच संतापजनक बातमी समोर आली आहे. एका नराधमाला पकडलं, त्या घटनेचा तपास सुरू झाला नाही तोच दुसरीकडे वासनेचा दुसरा लांडगा टपून बसलेला असतो. नेमकं काय होतंय आपल्या सुसंस्कृत पुण्यात? का असुरक्षित होतायत आपल्या चिमुरड्या? पाहुयात या घटनांचा हा विशेष रिपोर्ट...

‎

‎

‎पुण्यात गेल्या काही दिवसांत मानुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांची जणू मालिकाच सुरू झाली आहे.

‎

‎१ मे रोजी नसरापूरमध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आरोपीला फाशी द्या, या मागणीसाठी नवले पुलावर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.

‎

‎दुसरी घटना (म्हाळुंगे): येथेही एका ३ वर्षांच्या बालकावर अत्याचार करून त्याचा खून करण्यात आला.

‎

‎ही दोन्ही प्रकरणं ताजी असतानाच, चाकणच्या बिरदवडीमध्ये 9 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने, या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे ती बचावली.

‎

‎नेमकं घडल काय?

‎

‎शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडित 11 वर्षीय मुलगी घरात कोणी नसल्याने घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. यावेळी मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा (वय 32) याने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चिमुकलीने अत्यंत धैर्याने तेथून पळ काढल्याने ती बजावली. मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर, वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

‎

‎घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तर चाकण पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून आरोपी अरुण मिश्रा याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात पोक्सो  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

‎

‎

‎या तिन्ही घटनांमध्ये एक साम्य असं आहे की, आरोपींनी पीडित मुलं एकटी असल्याची संधी साधली. चाकणमधील आरोपी हा ३२ वर्षांचा परप्रांतीय मजूर आहे, तर म्हाळुंगे प्रकरणात एक १६ वर्षांचा मुलगा ताब्यात आहे. यावरून परिसरात राहणाऱ्या बाहेरील व्यक्तींची कोणतीही नोंद किंवा चारित्र्य पडताळणी होत नसल्याचं भयानक वास्तव समोर येत आहे.

‎

‎पुणे जिल्ह्याचा ग्रामीण आणि औद्योगिक पट्टा (चाकण, म्हाळुंगे) झपाट्याने वाढत आहे. इथे लोकसंख्या वाढतेय, पण त्या तुलनेत पोलिसांचे गस्त पथक आणि सीसीटीव्ही यंत्रणा तोकडी पडत आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. नसरापूरच्या घटनेनंतर लोकांचा संयम सुटला असून 'आंदोलने' हाच आता संताप व्यक्त करण्याचा मार्ग उरला आहे.

‎

‎घरात कोणी नसताना ११ वर्षांची मुलगी आपल्या काकांकडे जायला निघते आणि वाटेतच तिच्यावर हल्ला होतो, हे चित्र समाजासाठी धोक्याची घंटा आहे. शाळा, खेळण्याचे मैदान आणि स्वतःच्या घराचा परिसरही आता सुरक्षित उरला नसल्याची भीती पालकांमध्ये आहे.

‎

‎अशा नराधमांना केवळ अटक न करता, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून उदाहरणाखालची शिक्षा होणे गरजेचे आहे.

‎

‎एमआयडीसी आणि ग्रामीण भागात भाड्याने राहणाऱ्या प्रत्येक कामगाराची पोलीस नोंदणी सक्तीची असायला हवी.

‎

‎केवळ मेणबत्ती मार्च काढून चालणार नाही, तर आपल्या परिसरात वावरणाऱ्या संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे ही सामूहिक जबाबदारी बनली आहे.

‎

‎थोडक्यात  नसरापूरच्या चिमुरडीला न्याय मिळण्याआधीच चाकणमधील घटना समोर येणे, हे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. आता गरज आहे ती केवळ आश्वासनांची नाही, तर सुरक्षित वातावरणाची.