मावळ तालुक्यातील बौर गावाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या गटातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
मृतांमध्ये अयान अझर शेख (वय 20), प्रथमेश भास्कर शिंदे (वय 21) आणि अश्विन अनिल भालेराव (वय 18, सर्व रा. पुणे) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील काही मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळी मोटारसायकलवरून पवना नदीत पोहण्यासाठी गेले होते.
दुपारी सुमारे 1 वाजता ते बौर गावाजवळील नदीपात्रात उतरले. सुरुवातीला काठाजवळ पोहत असताना अयान शेख हा खोल पाण्यात गेला
आणि बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी प्रथमेश शिंदे आणि अश्विन भालेराव हे दोघे पुढे गेले, मात्र दुर्दैवाने तिघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने तिघांना बाहेर काढण्यात आले आणि तत्काळ कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केले.
या घटनेची नोंद कामशेत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार सचिन काळे करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.