बालभारती–पौडफाटा रस्त्यासाठी पर्यावरणीय मंजुरीचा मार्ग मोकळा; सल्लागार नियुक्तीला मान्यता स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती - टॉप न्यूज मराठी

पुणे : बालभारती ते पौडफाटा या विकास आराखड्यातील रस्त्याच्या कामाला पर्यावरणीय परवानगी मिळविण्यासाठी अखेर महापालिकेने हालचाली सुरू केल्या असून, एन्व्हायरोमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट (ईसी) मिळविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. या कामासाठी सुमारे एक कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. 

 या प्रकल्पासाठी ४ सिझन मध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार अहवाल तयार करण्यात येईल. या चार सिझनसाठी एकूण खर्च १ कोटी ५१ लाख होणार आहे. सिझन प्रमाणे पैसे दिले जाणार आहेत. असे भिमाले यांनी सांगितले. 

या रस्त्याची रुंदी सुमारे ३० मीटर करण्याचा प्रस्ताव असून, तो उन्नत मार्गाच्या स्वरूपात विकसित करण्याचाही विचार करण्यात आला होता. मात्र, या कामाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात समिती गठीत करताना, संबंधित प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन समितीने (एसईआयएसी) या प्रकरणी सुनावणी घ्यावी, असेही निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाने ईसी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. यासाठी मागील वर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढावी लागली. या प्रक्रियेत ‘आदित्य एन्व्हायरोमेंटल सर्व्हिसेस प्रा. लि.’ या एकमेव कंपनीने सहभाग घेतला. त्यामुळे हीच कंपनी पात्र ठरली.

सदर कंपनीने सादर केलेली निविदा सुमारे एक कोटी ५१ लाख रुपयांची असून, या कामासाठी अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने सल्लागार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.