भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात नातेसंबंधांना काळिमा फासणारी घटना घडली असून, पाहुणा म्हणून आलेल्या दिरानेच आपल्या भावजयीची निर्घृण हत्या केली आहे. या थरारक हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेली मृत महिला माधुरी तुळशीदास अंबादे आणि आरोपी दीर गौरव अंबादे हे एका लग्नासाठी पालांदूरला आले होते. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी भागडी येथील आपल्या नातेवाईकांकडे मुक्काम केला. मात्र, पहाटेच्या सुमारास जेव्हा घरातील मुलगी काही कामानिमित्त बाहेर गेली होती, त्याच संधीचा फायदा घेत गौरवने आपल्या भावजयीवर जीवघेणा हल्ला केला आणि घटनास्थळावरून दुचाकीने पळ काढला.