शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली.
या टोळीतील पाच आरोपींनी दौंडच्या भाकर वस्तीत राहणाऱ्या कुटुंबाला शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तीन लाख 52 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू चोरल्या.
या प्रकरणी अज्ञात आणि विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मोठे धागेदोरे हाती लागले. या टोळीने पूर्वी पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा व बीड जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, घोरफोडी आणि चोरीचे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या तपास पथकांच्या माध्यमातून 5 आरोपींना अटक केली. योगेश भोसले, सचिन भोसले, मिलिंद भोसले, सोन्या भोसले, गहिनीनाथ भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत, तर युवराज भोसले नावाचा आरोपी फरार आहे.
हे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याची सविस्तर माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.