पोलीस झाला, पेढे वाटले, बॅनर लावले... पण भांडाफोड झाला; पुण्यातील भाजी विक्रेत्याचा प्रताप - टॉप न्यूज मराठी

पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. त्याच पुण्यातून एक अजब प्रकार समोर आलाय. भाजीपाला विकणाऱ्या एका तरुणाने अचानकच आपण 

पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाल्याचे फ्लेक्स लावले. हे फ्लेक्स पाहून स्थानिक पोलीस त्याचा अभिनंदन करण्यासाठी घरी गेले. त्याचवेळी या तरुणाचा भांडाफोड झाला. आणि हे फ्लेक्स लावण्या मागचं खरं कारण समोर आलं.

हा प्रकार सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडला. 

ऋषिकेश राजू जाधव हा तरुण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न होतं, 

पण त्याच्यावर नियतीनेच अन्याय केला. उंची कमी असल्यानं त्याला पोलीस भरती करता आली नाही. 

तर दुसरीकडे, घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी तगादा लावला होता. आपला मुलगा पोलीस झाला तर त्याला चांगलं स्थळ येईल 

असं कुटुंबीयांना वाटत होतं. मात्र उंचीमुळे ऋषिकेश कधीही पोलीस होऊ शकत नव्हता. पण याच वेळी त्याच्या डोक्यात नको ती कल्पना आली.

 आपल्या आईला आनंद व्हावा यासाठी आणि चांगल्या मुलीचं स्थळ मिळावं यासाठी त्याने पोलीस झाल्याचं भासवलं. सोसायटीमध्ये आनंदाने पेढे वाटले.

 एडिट केलेला वर्दीतील फोटो व्हॉट्सॲप स्टेटस म्हणून ठेवला. पण एवढं करून तो थांबला नाही त्याने जवळपासच्या परिसरात मोठमोठे फ्लेक्स लावले. 

फ्लेक्स पाहून आपल्या हद्दीतील एक सामान्य मुलगा पोलीस झाला तर त्याचं कौतुक करायला हवं असं पोलिसांना वाटलं.

 त्यामुळेच नऱ्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी मोठ्या अभिमानाने त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. 

मात्र पोलिसांना पाहून ऋषिकेशची बोबडी वळली. पोलिसांनी नियुक्तीपत्र मागितलं असतं टाळाटाळ करू लागला. 

आणि तिथेच त्याचं बिंग फुटलं. ऋषिकेश पोलीस न झाल्याचं उघड झालं. 

त्यामुळेच पोलिसांनी अधिकार नसताना पोलीस असल्याचं भासवणं, महाराष्ट्र पोलिसांच्या चिन्हाचा गैरवापर करणं आणि लोकांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.