नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या कॉर्पोरेट प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडालेली असताना तशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण उपराजधानी नागपूरमधून समोर आलंय. एका एनजीओच्या आडून संचालकाने तरुणींचा मानसिक छळ, विनयभंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप करण्यात आले आहेत. चार तरुणींनी तक्रार दाखल केल्यानंतर संचालक रियाज काझी याला पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूरच्या मानकापूर परिसरात ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’ नावाची स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेत पूर्वी काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीनं संचालक काझी विरोधात तक्रार दाखल केली. या तरुणीच्या वाढदिवसाच्या केक कापल्यानंतर काझी याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही दोन-तीन वेळा त्याने तसंच कृत्य केलं. मात्र तरुणीने विरोध केल्यामुळे अनुचित प्रकार टळला. या मुली पाठोपाठ आणखी तीन मुलींनी तक्रारी दिल्या. काझी हा ऑफिस मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करयचा. तरुणींना केबिनमध्ये बोलावून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करायचा. याशिवाय तरुणींना मुस्लिम धर्मानुसार नियम पाळण्यास सांगायचा. या तरुणींना नमाज पठण आणि रोजे ठेवण्यासाठी दबाव टाकायचा. मुस्लिम धर्मातील चालीरीती वारंवार समजावून सांगायचा. तसेच अभिवादनासाठी ‘खुदा हाफिज’ म्हणण्याची सक्ती करायचा. एवढेच काय तर तरुणींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बनावट सोशल मीडिया खात्यांचा वापर होत होता, असा सगळा उल्लेख तक्रारी मध्ये आहे. त्यामुळेच पोलिसांनी तातडीने कारवाई करत रियाज काझीला अटक केली. मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्ष कळसेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
आरोपी रियाज काझी याला काल अटक करण्यात आली असून न्यायालयापुढे हजरही केलं. त्याला 23 तारखेपर्यंतची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून ऑफिसमध्ये जाऊन पुरावे गोळा केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्याने हे प्रकार आणखी काही तरुणींबरोबर केले आहेत का याची पडताळणी होणार आहे. तर नाशिक टीसीएसप्रमाणे या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे याचा तपास केला जातोय.