पुणे (प्रतिनिधी) : सध्या शिक्षणक्षेत्रासह समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये जे स्थित्यंतर होत आहे त्या विषयी आपण सर्वांनीच सजग राहणे आणि आवश्यक तिथे भूमिका घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
आचार्य डॉ. माधव पोतदार यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्ताने शब्दसारथी आणि पोतदार परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्वरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र खेर (साहित्य), ज्येष्ठ शाहीर दादा पासलकर (शाहिरी परंपरा), श्रुती पानसे (शैक्षणिक), अजय कांबळे (पत्रकारिता) यांचा सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे मी अल्लादियाखां या अश्विनी भिडे देशपांडे लिखित पुस्तकाला साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राजहंस प्रकाशनाच्या वतीने डॉ. प्रिया निघोजकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
डॉ. विद्यासागर म्हणाले, सध्या जे नवे शैक्षणिक धोरण लागू केलेले आहे त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाविषयी अधिक चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. यातून आपल्याला सर्वांनाच या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे.
कॅप्टन आशिष दामले म्हणाले, चांगल्या उपक्रमांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजातील चांगल्या लोकांना उभे करणे या दृष्टीने परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे.
त्या दृष्टीने जिथे जिथे मदतीची गरज असेल तिथे चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पोतदार कुटुंबीयांनी जपलेला हा वारसा समाजासाठी आदर्शवत आहे.
राजेंद्र खेर यांनी आपल्या मनोगतातून आपल्या साहित्यनिर्मितीचा प्रवास उलगडला. ते म्हणाले,
आपण जे काम करू ते अगदी मनापासून आणि तन्मयतेने करायचे या भावनेतून मी लिहित आलो.
त्याला मराठी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. उपेक्षित ते अपेक्षित असे धोरण ठेवून मी लेखन केले.
श्रुती पानसे म्हणाल्या, सध्याच्या यंत्रयुगामध्ये मोबाईलमुळे मुलांच्या भावनिक अवस्थांवर जे परिणाम होत आहेत
ते खूप गंभीर असून हा घराघरातला प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नावर आपण सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे आहे.
अजय कांबळे म्हणाले, सध्याच्या पत्रकारितेसमोर अनेक प्रश्न आणि अनेक आव्हाने आहेत. त्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे
आणि काळाच्या प्रवाहानुसार स्वतःला बदलत पुढे नेणारेच टिकून राहतील.
प्रास्ताविक डॉ. मनिषा पोतदार यांनी केले. पराग पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नगंधा वस्ते यांनी आभार मानले.